राज्यातील पोलीस पाटील वर्गाला १५००० रु. अशी भरघोस मानधन वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला

बालासाहेब पाटिल
आइडियल इंडिया न्यूज़
राज्यातील पोलीस पाटील वर्गाला १५००० रु. अशी भरघोस मानधन वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्याबद्दल चाळीसगाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. बोरखेडा खुर्द गावाचे पोलीस पाटील शरद पाटील यांनी गेल्या ८ महिन्यांपासून जोपर्यंत पोलीस पाटील मानधन वाढ होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा संकल्प केला होता, आज त्यांना माझ्याकडून नवीन चप्पल भेट देत ती त्यांना परिधान केली व त्यांच्या संकल्पाची पूर्ती केली.
पोलीस पाटील यांना मिळणारे ६५०० हे मानधन अतिशय तुटपुंजे असल्याने राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.
यासाठी पोलीस पाटील संघटनांच्या वतीने माझ्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. यासाठी अधिवेशनादरम्यान मोर्चे काढण्यात आले, अनेक शासकीय स्तरावर बैठका घेण्यात आल्या.
पोलीस पाटील संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्रिमंडळाच्या कालच झालेल्या बैठकीत पोलीस पाटील यांचे मानधन ६५०० वरून थेट १५००० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दि.७ मार्च रोजी चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाला नामदार गिरिषभाऊ महाजन आले असता तालुक्यातील पोलीस पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे तुमच्या विषयाबाबत अतिशय सकारात्मक असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याचे आश्वासन दिले होते. अखेर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मानधनवाढीचा निर्णय झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांनी आपला शब्द पाळला आहे. त्याबद्दल सर्व पोलीस पाटील संघटनांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.
पोलीस प्रशासन व गाव यातील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात, अनेक कठीण प्रसंगात त्यांची मोलाची मदत प्रशासनाला होत असते मात्र त्यांना मिळणारे अतिशय अल्प मानधन व शासनाकडून कुठल्याही भरीव सुविधा त्यांना मिळत नसल्याने त्यांच्या विविध मागण्यांसाठी माझा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. मागील काळात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सन २०१९ मध्ये पोलीस पाटील यांचे मानधन ३००० वरून दुप्पट ६५०० करण्यात आले होते मात्र नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत ही वस्तुस्थिती होती, त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस हेच पोलीस पाटील वर्गाला न्याय देऊ शकतात याचा मला विश्वास होता. आज अखेर भरघोस अशी मानधनवाढ करण्याचा मंत्री मंडळ बैठकीत निर्णय झाल्याने ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या एका जबाबदार घटकाला भाजपा महायुती सरकारने न्याय दिला आहे.
– आमदार मंगेश रमेश चव्हाण