पाचोरा – भडगांव तालुक्यात बियाणे टंचाई* लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – भाजपचा आरोप

*पाचोरा – भडगांव तालुक्यात बियाणे टंचाई*
लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – भाजपचा आरोप
मतदारसंघात कापूस बियाणे टंचाई !
रिपोर्टर – आबासाहेब सुर्यवंशी
पाचोरा – पाचोरा -भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करून द्या, अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा पाचोरा तालुका भारतीय जनता पक्षाने प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. खरीप हंगामाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून परिसरातील प्रमुख पीक असणारे कापूस बियाणे सध्या बाजारात उपलब्ध होत नसल्याने कापुस बियाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीने आवाज उठवला आहे . पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी खरीप हंगाम लागवडीच्या तयारीला लागले असून शेती मशागतिची कामे करून झाली आहे . कापूस लागवडीसाठी त्यांना आवश्यक असणारे कापूस पिकांच्या बियाण्याची टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काळात देखील दुष्काळ सदृश्य तालुक्याच्या नावाने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल झाली आहे. शेजारील चाळीसगाव तालुक्यातील आ. मंगेश चव्हाण यांनी त्यांचा चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून घेण्याकरिता विशेष प्रयत्न करून १३३ कोटीचे पॅकेज चाळीसगाव तालुक्याला मंजूर करून घेतले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना भरीव अशी मदत शासनाकडून मिळाली.
*लोकप्रतिनिधींच्या कार्य पद्धतीवर अप्रत्यक्ष आरोप !*
येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाचोरा – भडगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून घेतला नाही. फक्त दुष्काळ सदृश्य घोषित झाला असल्याचे सांगत मतदार संघांतील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत असा अप्रत्यक्ष आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला असून दुष्काळ सदृष्य घोषणेचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाला नाही. दोन्ही तालुक्यातील शेतकरी आजही मदतीच्या आशेवरच आहे. त्यातच बियाणे टंचाई अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या ऐन खरीप हंगामाच्या लागवडीला सुरुवात झाली असतांना शेतकऱ्यांना आवश्यकते नुसार बियाणे उपलब्ध होत नसल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने या संदर्भात उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना निवेदन देऊन याबाबतीत तात्काळ कृषी विभागाला सूचना कराव्यात व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे कसे उपलब्ध करून देता येईल अशा उपाययोजना कराव्या. आणि बियाणे टंचाई दूर करावी अन्यथा सत्ताधारी पक्षात असताना देखील पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यां करिता रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.या प्रसंगी माजी सभापती बन्सीलाल पाटील सह भाजपाचे पदाधिकारी उपस्थीत होते.